“जाणता राजा”
संसारी कितीक,असती नाती गोती
बहिणभाऊ, मोलाची माणिक मोती
महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतीक, सामाजिक,राजकीय चळवळीत जे अनेक परिवार पिढ्यान पिढया त्याच सातत्याने समाजात काम करतात त्यात थोरात पाटील हा एक नावाजलेला परिवार आहे पिढ्यान पिढया कष्टाळू वृत्ती, सर्वधर्म समभावाची वागणुक, नेतृत्व गुण, पुरोगामी विचार दूरदृष्टी, अध्यात्मिकता असे सर्व गुणसंपन्न असा हा परिवार आहे उत्तम नेतृत्व घडते त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असतात नेतृत्व एक दिवसात घडत नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील “ जोर्वे ” हे एक ऐतिहासिक गाव. सह्याद्रीच्या कुशीत उगम पावणारी अमृतवाहिनी “ प्रवरा ” नदीच्या तीरावर वसलेले हे एक संपन्न गाव. नदीच्या काठावर प्रसिध्द एकमुखी दत्ताचे मंदिर, पुरातन काळातील कथा असलेले, सर्वांची श्रध्दा असलेलेधार्मिकस्थळ. ऐतिहासिक संस्कृती असणारे “जोर्वे” संस्कृती म्हणून दिल्लीच्या संग्रहालयात असणारे हे प्रसिद्ध गाव.
थोरात पाटील परिवाराची परंपराच वेगळीच. हे आमचे पंजोबा गंगाराम पाटील थोरात हे गावचे पाटील व पंजी मंजुळाबाई थोरात अर्थात गावची पाटलीण.त्यांचा गावात खुप दरारा. सगळंगाव त्यांना खूप घाबरे ह्या उभयतांचे व्यक्तीमत्वच तसे होते. सगळ्या गावाला सांभाळून घेणारे असे जबरदस्त दांपत्य. त्यांच्या ह्या अनेक पैलू असलेल्या वागण्यातूनच परिवार घडत गेला. पुढे माझे आजोबा संतुजी पाटील थोरात व आजी सिताबाई यांच्या पोटी सहा भावंड झाली. तीन मुले व तीन मुली, त्यातील माझे वडील स्व.भाऊसाहेब हे सर्वात थोरले. त्यानंतर पंडीतराव, मधुकर हे बंधु व भगिनी हिराबाई, मीराबाई व ताराबाई.माझे वडील स्व भाऊसाहेब थोरात यांनी वयाच्या 18 व्या वर्षापासुन 86 व्या वर्षापर्यंत स्वांतत्र्याची चळवळ सहकाराची उभारणी, अनेक चळवळी यात अखंड 68 वर्ष घालविली. हे सर्व करता करता कुटुंबातील कर्तव्यही पार पाडली.माझे वडील तिर्थरुप स्व.भाऊसाहेब थोरात व आई ति.मथुराबाई यांच्या पोटी 7 फेब्रुवारी 1953 रोजी श्री.बाळासाहेबांचा जन्म संगमनेर खुर्द येथे आजोळी झाला. आम्ही चार बहिणी व आम्हा बहिणींचा सर्वांचा लाडका भाऊ. आम्ही बहिणी, भाऊ त्याला आदराने “भाऊ”म्हणतो. पुढची पिढी त्याला “आबा”म्हणते. ग्रामीण भागातील सर्व संस्कार भाऊंवर झाले. म्हणजे सर्व संस्कार मोठ्या माणसांच्या कृतीतूनच झाले. आमच्या कुटुंबात सर्वांना कष्टाची सवय, शेतीची कामे, स्वत:करण्याची पद्धतच होती. आमची आई ति.मथुराबाई दादांच्या कामाच्या व्यापामुळे संपुर्ण शेती सांभाळत. दादांना वेळ मिळेल तसे ते शेतात स्वत:राबत त्यामुळे बाळासाहेबही सर्व शेतीची कामे शिकले. ट्रॅक्टरने नांगरणी करणे, पेरणी, मोटारींच्या दुरुस्त्या, गायी म्हशींचे संगोपन इ. सर्व कामे तो स्वत: करत असे एकदा ते डिझेल इंजिन दुरुस्ती करतांनी एक भाग पायावर पडून पाय फ्रॅक्चर झाला होता.

आमच्या घरी आजोबांचे “ग्रंथालय” होते. त्यात स्वामी विवेकानंद चरित्र, भगवतगीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, सर्व धार्मिक ग्रंथ होते. नंतर दादांचेही वाचन खूप असल्याने त्यात अनेक चरित्र जगातील लढे, कम्युनिझमचे अनेक पुस्तके होती. त्यातूनच घरांत सर्वांनाच वाचनाची आवड निर्माण झाली. नंतर भाऊंची ही पुस्तक वाचन, संग्रह वाढतच गेला. वस्तीवर दादांनी शामची आई, बनगरवाडी इ पुस्तकांचे सामुदायिक वाचन ठेवले होते. दादांना स्वातंत्र्य चळवळीत डॉ.अण्णासाहेब शिंदे, ॲड. रावसाहेब शिंदे, ॲड. पी. बी. कडु पाटील, धर्माजी पोखरकर इ. सहका-यांसोबत सहवासामुळे तुरुंगातील वास्तव्यात सामुदायिक वाचनाची सवय लागली होती. वाचनाची तीच परंपरा आज पुढच्या पिढीतही चालुच आहे.
थोरात परिवारात जात-पात कधी मानली नाही. मुस्लीम समाजाची चाँदबीबी आई ही आमच्या कुटुंबातील सदस्यच होती. माझ्या आईचे व तिचे मायलेकीचे नाते होते. चांभार समाजाच्या वनाई, शांताबाई भोसले ह्या आईच्याजीवलगमैत्रिणी होत्या. चांभार समाजाच्या सावित्रीमामी आमच्याकडे स्वयंपाकाला होत्या. सावित्रीमामींना अतिशय स्वच्छतेची आवड.घरी सर्व आवरुन देवपुजी करुन स्वत:व्यवस्थितच मग स्वयंपाकाला येणार अशी सर्व धर्म समभावाची शिकवण कुटुंबात होती तसेच संस्कार भाऊंवर झाले.
अंधश्रध्दा तर कधीच मानली नाही. प्रवरा नदिच्या कडेला आमचे गु-हाळ चाले. एक दिवस सर्व भावंडांनी भाऊला सातवीत असतांना अमावस्येच्या रात्री गु-हाळात गुळ घेऊन येण्याचीपैंज लावली.भाऊ अंधारात एवढ्या रात्री एकटा जाऊन गुळ घेऊन आला. आम्ही सर्व बहिणी नगरला,पुण्याला वसतिगृहात शिकत असतांनी आम्हाला वसतिगृहात सोडणे, आणणेसर्व भाऊच करी. कारण दादांना ह्या सहकाराच्या उभारणीमुळे वेळ मिळत नसे. उन्हाळ्याच्या, दिवाळीच्या सुट्यां भाच्यांनापिकनिकला नेणे, त्यांचे लाड करणे. आम्हा बहीणींना सासरी सोडणे, माहेरी आणणेआम्हाला मनपंसद साड्या आणणे. कुटुंबातील अनेक जबाबदा-या त्याने लहानवयापासुनच सांभाळल्या.
पुढे कॉलेजला संगमनेर व नंतर पुण्याला गेला. तेथून पुढे महाराष्ट्रातील मोठा मित्र परिवार मिळाला. पाणी पंचायतमधुन पाणी प्रश्नावंर आंदोलन केले. परीक्षा फी माफी, विडीकामगारांचे प्रश्नांवरील आंदोलनाचे नेतृत्व केले.1980 साली विडी कामगारांच्या प्रश्नांच्या आंदोलनात 9 दिवस कारावास झाला.मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत ही भाग घेतला.हे काम करता करता सहकाराची सुरुवात जोर्वे दुध उत्पादक संस्थेची स्थापना करुन केली.1985 साली जनतेच्या प्रेमामुळेच अपक्ष आमदार म्हणुन निवडुन आला.सर्वात कमी वयाचा आमदार म्हणुन विधानसभेत बसण्याची संधी मिळाली.
हरितक्रांती व श्वेतक्रांतीचे प्रणेते आमचे मामा डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या सहवासाचा भाऊंना फायदा झाला.स्व.अण्णासाहेबां बरोबरपरदेशदौरे करण्याची संधी मिळाली. भाऊंच्या जीवनात स्व.यशवंतराव चव्हाण, स्व.वसंतदादा पाटील, स्व. इंदिरा गांधी, स्व.राजीव गांधी यांसारख्या खुप मोठ्या माणसांचा सहवास मिळाला व त्यातून व्यक्तिमत्व घडत गेले. जोर्वेच्या घरी मोठे ग्रंथालय होते.आजोबा, वडील सर्वांनाच वाचनाची आवड. तशीच आवड भाऊंनाही खूप आहे. वाचनाने विचारात समृध्दता येत गेली. स्व.दादांची साधी रहाणी व उच्च विचार सरणी नुसार भाऊंमध्ये साधेपणा, व विचारात उच्चपणा आहे. बोलण्यात मितभाषी आहेत. वकृत्व अतिशय सुंदर आहे. माणसे ओळखण्याचा एक सुप्तगुण त्यांच्यात आहे. त्यांनी कधीही राजकारणात कोणाचे पाय ओढण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. वरवर गोडबोलणे, गळ्यात पडणे व खालून मात्र पाय घालून पाडणे ही वाईट वृत्ती त्यांच्यात नाही. जे बोलायचे ते स्पष्ट बोलायचे.चुकत असेल तर तोंडावर स्पष्ट बोलतात.
आज ह्या पक्षात तर उद्या त्या पक्षात अशी धरसोड वृत्तीही नाही. भाऊ शांत, संयमी, स्थितपज्ञ वृत्तीचा आहे. पद असो-नसो शांतपणे कामकाज करणारा, साधेपणाजपणारा, माणसांना जीव लावणारा असे व्यक्तीमत्व सर्वांना प्रिय झाले. म्हणुनच प्रचंड लोकप्रियता मिळावी. त्यांच्या अशा व्यक्तीमत्वामुळेकॉंग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्यांचा आवडता आहे. अशा व्यक्तीमत्वामुळे 1999 साली राज्यमंत्री पद मिळाले तर आजपर्यत 2013 पर्यंतचे महसूलमंत्री पदापर्यंत वेगवेगळे खाते सांभाळतांना त्यांच्यातील अनेक गुण वैशिष्टांचे पैलु आपल्याला दिसले.संपुर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करतांना दिल्लीत सुध्दा त्याला सतत मानानेच ओळखले जाते. एवढा मंत्रीपदाचा, राज्याचा व्याप, मतदारसंघातील कामे संभाळत असतांनी त्याने दादांच्या जाण्यानंतर सहकारातील व्यवस्थापन अतिशय उत्तम ठेवले. सध्या संपूर्ण भारताला दिशादर्शक असलेला सहकार त्यांच्या बारीक नजर,दुरदृष्टी,उत्तम व्यवस्थापनातुन उभा आहे.
महाराष्ट्रभरच्या दौऱ्यात तो कधीच बोलण्याचा अतिरेक करत नाही. ज्या लोकांच्या सहकारी संस्था मोडल्या, मोडकळीस आल्यात तेच महाराष्ट्रभर भाषणे करत फिरतात. “सहकार टिकला पाहीजे”. पण आमचे भाऊ इथला अति उत्तम चालणारा सहकार असूनही अहंकाराने कधीही बोलत नाही. खरतर सहकार टिकला पाहीजे असे आज अधिकारवाणीने फक्त तोच सांगु शकतो. आज इथला सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना हा 11 लाख मेट्रीक टनापर्यंत गाळपक्षमता असलेला कारखाना आहे. साखर उतारा 11.80 म्हणजे महाराष्ट्रात वरच्या क्रमांकावर आहे. तांत्रिक कार्यक्षमता, उर्जा बचतीचे अनेक पारितोषिके कारखान्याने मिळविलेले आहे. उसाच्या मळीपासून डिस्टीलरीप्लॅन्ट चालू आहेत. दारुचा परवाना मिळत असूनही ति. दादांनी समाजिक नैतिकतेची जाणीव ठेवून इंडस्ट्रीअल अल्कोहोल तयार करण्याचा ठाम निर्णय घेतल्यामुळे इथे इंडस्ट्रिअल अल्कोहोलच बनविले जाते. आज कारखाना महाराष्ट्रात सर्वाधिक भाव देणारा, कर्मचाऱ्यांचे पगार, बोनस वेळेवर देणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. याचे सर्व श्रेय दादांच्या कृतीतून घडलेल्या भाऊंनाच दिले जाते. आताच्या निवडणूकीत पराभव झाला पण ते “स्थितप्रज्ञ” स्वभावाचे आहेत. त्यामुळे त्यांनी कोणतीच प्रतिक्रीया दिली नाही.
आज महाराष्ट्रातील सर्व शेतकी संघ बंद पडलेले आहेत. फक्त संगमनेरचाच शेतकीसंघ उत्तमप्रकारे चालू आहे. संगमनेर तालुका दूध संघ महाराष्ट्रातील एक नंबरचा तालुका पातळीवरचा दुध संघ आहे. रोजचे दुध संकलन सरासरी 3 लाख 4 हजार लिटरपर्यंत आहे. “राजहंस” नावाने संपूर्ण महाराष्ट्रात व राज्याबाहेर, गुजरात, कर्नाटकमध्ये 2 लाख 45 हजार पाऊच खपतात. दुधाचे विविध दुग्धजन्य पदार्थ तुप, दही, श्रीखंड, ताक, लस्सी, पेढे, गुलाबजाम, चीज, पनीर, ही लोकप्रिय आहेत. “राजहंस” पाणी ही लोकप्रिय आहे. तालुक्यात कोट्यावधी रुपायांची उलाढाल सहकारामुळेच होतो. त्यामुळे तालुक्यात सुबत्ता, संपन्नता आहे. तालुक्यात पॉलीटेक्नीक, अमृतवाहिनी इंजिनिअरींग, डेंटल कॉलेज, फार्मसी कॉलेज, तसेच मुकबधीर व मतीमंद विद्यालय, आदिवासी आश्रमशाळा व तालुक्यात 21 हायस्कुल 2 प्राथमिक स्कुल, 10 ज्युनिअर कॉलेज, 2 सिनिअर कॉलेज, अमृतवाहिनी मॉडेल स्कुल व सी.बी.एससी. स्कुल उभे आहे. त्याकडे भाऊचे दुरदृष्टीने वाढविण्याचा विचार चालूच असतो. कृषी महविद्यालय सुध्दा सुरु केले आहे. त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची आवड आहे. आता नवीनच आलेले. AI तंत्रज्ञान अवगत केले ते स्वत: अष्टपैलु व्यक्तिमत्व आहे.त्यांची निर्णय शक्ती उत्तम आहे. जगातील नवनवीन गोष्टींचा त्यांना अभ्यास आहे.
हे सर्व करत असतांनी राज्यातील कामाचा व्याप, सहकार, शैक्षणिक संकुल सांभाळत असतांनी ते पर्यावरणाचाही खुप विचार करतात. त्यामुळे दादांनी सुरु केलेली “दंडकारण्याची ” चळवळ वृक्षरोपणाकडे ही त्यांचे खुप लक्ष असते. मी दादांना म्हणायचे दादा आम्ही किती भाग्यवान तुम्ही सर्व कामे उभी केली. त्यामुळे पुढे आम्हाला नेतृत्व करायला मिळते. भाऊ किती भाग्यवान त्याला महाराष्ट्राचे नेतृत्व करायला मिळते. पण दादा म्हणायचे बाळासाहेब कर्तृत्ववान मुलगा आहे. म्हणून तो हे सगळ व्यवस्थित सांभाळतो.
अशा या आमच्या लाडक्या बंधुराजा साठी आम्ही बहिणी एवढेच म्हणतो की,
“चवघी आम्ही बहिणी, योकच भाऊराया”
झाकुनी गेल्या, मोगऱ्याखाली काया ।।१।।
बहिण भावंडाची माया, अंतर काळजाची
पिकल सिताफळ, त्याला गोडाई साखरेची ।।२।।
माहेरीच्या देवा, नाही तुला मी विसरत
पाठीचा बंधुजीचा, वेल जावु दे पसरत ।।३।।
माझ्या या आयुष्याची देवा, आखुड घालदोरी
हौशी बांधवाला माझ्या, घाल शंभर पुरी ।।४।।
. दुर्गा सुधीर तांबे,