गणरायाला निरोप देण्यासाठी
कोपरगाव नगरपरिषद प्रशासन सज्ज
कोपरगाव मनिष जाधव – घरगुतीसह गणेश मंडळांच्या गणरायाला निरोप दिला जाणार असल्याने कोपरगाव नगरपरिषदेकडुनही जय्यत तयारी केली आहे. पालिकेच्या वतीने गणेशमूर्तीच्या पर्यावरणपूरक विसर्जनासाठी शहरात ०४ ठिकाणी कृत्रिम कुंडा॑ची (ट्रॅक्टर) व्यवस्था पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी व उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. या कालावधीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार व कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी पोलीस प्रशासनाने नियोजन केले आहे.
कोपरगाव शहरात सकाळ पासूनच घरगुती गणरायाला निरोप देण्यासाठी सुरूवात होणार आहे. परिषदेच्या वतीने पर्यावरणपूरक विसर्जन व्हावे यासाठी दरवर्षी प्रयत्न केले जातात. गेल्या वर्षी चांगले पध्दतीचे नियोजन झाल्याने या वर्षी देखील पालिकेच्या वतीने ०४ ठिकाणी व्यवस्था केली असून पालिकेचे १५० कर्मचारी, अधिकारी या ठिकाणी तैनात असणार आहेत. मोठे गणपती ३० ते ३५ तर लहान मुर्ती १० हजार पेक्षा जास्त गणेश विसर्जन असल्याने शहरात वाहतूकीला अडथळा येवु नये यासाठी दरवर्षीप्रमाणे पालिका व पोलिस प्रशासनाने नियोजन केले आहे.
शहरात ठिकठिकाणी ठेवण्यात आलेल्या कृत्रिम कुंडा॑त विसर्जन करण्याची विनंती देखील पालिकेच्या वतीने केली आहे. याशिवाय मुर्तीदान संकल्पनेसाठी प्रयत्न केले जाणार आहे. निर्माल्य नदीपात्रात टाकले जाऊ नये खबरदारी देखील नगरपरिषदेने घेतली असून निर्माल्यासाठी कृत्रिम कुंडा॑च्या जवळच स्वतंत्र व्यवस्था केली आहे. रात्री उशिरापर्यंत विसर्जन होणार असल्याने विद्युत व्यवस्था व आपत्कालीन व्यवस्था करण्यात आलेली आहे.
चौकट
कृत्रिम कुंडा॑चे (ट्रॅक्टर) ठिकाण✓ छत्रपती संभाजी महाराज चौक ( विसपुते सराफ परिसर)
✓ गोदावरी पेट्रोल पंप ( निवारा रोड )
✓ एस.टी. स्टॅन्ड परिसर
✓ शनी मंदिर (टिळक चौक )