कोपरगाव शहरासह अनेक गावांत गल्लीबोळात बोकाळलीय अवैध सावकारी
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – कर्जदारांकडून भरमसाट दराने व्याज आकारणी… मुद्दल, व्याज आणि त्यावर दंडव्याजाची रक्कम वसूल करायची…त्यानंतर पुन्हा जादा पैशांची मागणी… वेळेवर पैसे न दिल्यास दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर आदी वस्तू ताब्यात घेण्याचा धडाका सध्या कोपरगाव शहरासह, संवत्सर, जेऊर कुंभारी, चांदेकसारे, शिंगणापूर, दहेगाव, कासली तसेच पूर्व भागासह बेकायदा सावकारीचा धंदा शहरात जोरात फोफावला आहे. प्रशासनाने अवैध सावकारी मोडून काढण्यासाठी “ऑपरेशन सावकरी” विशेष मोहीम राबवावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

तालुक्यात बोटावर मोजणे इतकेच परवानाधारक सावकार असुन त्यांनी सहकार खात्याकडे नोंदणी देखील केली असुन त्याचे कामकाज प्रशासनाच्या डोळ्यासमोर कामकाज चालू आहे. परंतु ज्यांना सावकारीचा परवाना नाही असे सावकारांनी चांगलेच डोकें वर काढले आहे.
एखादी व्यक्ती आर्थिक अडचणींमुळे कर्ज घेण्यासाठी बॅंकेत जाते. परंतु तेथे अर्जासोबत कागदपत्रे, तारण, त्याच बॅंकेतील सभासद असलेली व्यक्तीच जामीनदार हवी, यासह विविध अटींची पूर्तता करावी लागते. त्याची पूर्तता न केल्यास बॅंक कर्ज देत नाही. त्यामुळे ती व्यक्ती पतसंस्थेकडे जाते. परंतु पत नसल्यामुळे तेथेही कर्ज मिळत नाही.
पतसंस्थेतही निभाव न लागल्यास व्यक्तीला शेवटी नाइलाजास्तव सावकाराकडे जावे लागते. त्यात पुन्हा बेकायदा सावकारी. हे सावकार कर्जदारांकडून मुद्दल, व्याज, दंडव्याज आकारतात. बऱ्याचदा मुद्दलाच्या रकमेपेक्षा व्याजाची रक्कम जास्त असते.

अवैध सावकारीचा धंदा करणाऱ्यांनी गरीब व गरजू लोकांच्या अडचणींचा फायदा उठवत अनेक खासगी सावकार ३ ते १० टक्के व्याजाने पैसे देत असल्याचा छुपा धंदा मोठ्या प्रमाणावर होत आहे, काही जण तर चक्क २० ते ४० टक्के व्याजानेही पैसे देत आहेत, हे व्याजाचे दर डोळे पांढरे करणारे आहेत. परंतु, पर्याय नसल्यामुळे अनेक जण या अवैध सावकारीचा धंदा करणाऱ्यांकडून पैसे घेत आहेत.

मुद्दल परत करूनही जादा पैशांसाठी बेकायदा सावकारांकडून कर्जदारांना घरी जाऊन शिवीगाळ, मारहाणीचे प्रकार सुरू आहेत. जामीनदारांनाही मानसिक त्रास दिला जात आहे. परंतु अनेकजण भीतीपोटी पोलिसांकडे किंवा सहकार खात्याकडे तक्रार देत नाहीत. कर्जदारांची पिळवणूक करणाऱ्या सावकारांविरुध्द पोलिसांनी व सहकार खात्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात असली तरी पुढाकार कोण घेणार ही महत्त्वाची बाब राहणार आहे.
आजच्या इंटरनेट युगात सर्व विश्व मोबाइलमध्ये सामावलेले असून, त्यात जुगारही समाविष्ट आहे. तरुणाई या ऑनलाइन जुगाराच्या मोहात पडली असून, तेथे नशिब आजमावण्याच्या नादात तरुणाई खासगी सावकाराकडून 10 ते 20 टक्क्याने कर्ज घेत असते. जुगारांमध्ये पैसे कमवण्याच्या नादात तरुणाई कर्जाच्या विळख्यात फसते. अशा तरुणांना हेरण्यासाठी सावकारांकडे स्वतंत्र यंत्रणाही कार्यरत असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे कर्जाची नियमित परतफेड होण्यासाठी सावकारांकडून अल्पबचत प्रतिनिधी नेमले जातात जे कर्जदाराकडून रोज ठरावीक रक्कम घेतात व ती सावकाराकडे जमा करतात. काही ठिकाणी काम करणारे कामगारवर्ग मालकाकडून व्याजाने पैसे घेतात. तसेच पगारातून पैसे काढून कर्ज फेडण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, मालकही पगारातून फक्त व्याज घेण्यावर भर देतो त्यामुळे वर्षानुवर्षे मुद्दल तशीच राहत असल्याने कामगारांना कर्जाच्या डोंगराखाली दबून राहावे लागत आहे.