आदियोगी शिव मूर्तीचा देखावा ठरत आहे कोपरगावकरांसाठी पर्वणी
कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेने साकारला देखावा
कोपरगाव प्रतिनिधी मनिष जाधव – कोइम्बतूर आणि बंगळुरू आदियोगी शिव मूर्तीच्या धर्तीवर कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटना यांच्या वतीने शहरातील बस स्थानक परिसरात गणेशोत्सवा निमित्त आदियोगी शिव हा देखावा साकारण्यात आला आहे. येथे आकर्षक अशी रंगीबेरंगी विद्युत रोशनाई करण्यात आली असल्याने हा देखावा कोपरगाव शहर वासियांसाठी एक पर्वणी ठरत आहे.

आदियोगी शिव मूर्ती भारतीय संस्कृती आणि योग परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. आदियोगी म्हणजे पहिला योगी, जो भगवान शिवाच्या ध्यानावस्थेतील रूपाला दर्शवतो. ही मूर्ती आध्यात्मिक ज्ञान, आंतरिक शांती आणि प्रबोधनाचे प्रतीक आहे.सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी ईशा फाउंडेशनच्या माध्यमातून या मूर्तीची रचना केली आहे.याच धर्तीवर संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे कार्यकारी संचालक विशाल झावरे यांच्या संकल्पनेतून शहरातील कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटना यांच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त आदियोगी शिव हा २५ फुटी देखावा साकारण्यात आला आहे. येथे दररोज संध्याकाळी ७ वाजता एक अद्भुत लाईट आणि ऑडिओ शो आयोजित केला जात आहे. यामुळे मोठ्या संख्येने कोपरगावकर नागरिक कुटुंबीयांसह घराबाहेर पडत हा देखावा बघण्यासाठी मोठी गर्दी करत असून ही एक शिवभक्तांसाठी पर्वणी ठरत आहे.
गणेशोत्सव म्हटलं की सर्वांना वेध लागतात ते बाप्पाच्या भोवती केल्या जाणाऱ्या डेकोरेशनचं. दरवर्षी एकापेक्षा एक डेकोरेशन्स पाहायला मिळतात.यावर्षी गणेशभक्तांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. अन् याचं प्रतिबिंब गणेशमुर्ती आणि डेकोरेशन्समध्ये देखील पाहायला मिळतेय. याच पार्श्वभूमीवर एक देखावा सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेतोय. आदियोगी भगवान शिव यांचा हा देखावा पाहून असंच वाटतंय की भगवान शिव जणू कोपरगावात अवतरले आहेत. कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेने
हा देखावा इतका हुबेहुब तयार केलाय की प्रथमदर्शनी पाहाता विश्वास बसणार नाही की हा देखावा आहे. खरोखरचं देखावा नसून हा कोइम्बतूर आणि बंगळुरू येथील आदियोगी शिव मूर्ती आहे.
हा देखावा संघटनेचे संस्थापक राजेंद्र झावरे, अध्यक्ष कैलास जाधव,उत्सव समिती अध्यक्ष राजेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल झावरे यांच्या संकल्पनेतून साकरण्यात आला आहे. या देखाव्यासाठी रवींद्र आरणे, रमेश पवार,अनिल वाघ, रवींद्र वाघ,राजेंद्र कोपरे, फिरोज तांबोळी, सुनील तांबट,सुनील लोणारी, राजेंद्र नावाडकर, सचिन नवले,अरुण दिवेकर,भरत शिनगारे, प्रकाश शेळके, मल्हारी देशमुख आदिसह रिक्षा व टॅक्सी संघटनेचे सभासदांनी परिश्रम घेतले आहे.
कोपरगाव हा धार्मिक पौराणिक व ऐतिहासिक वारसा लाभलेला तालुका आहे. गणेश उत्सव कोपरगाव तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी कोपरगाव तालुका ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनेच्या वतीने आदीयोगी शिव यांची प्रतिकृतीचा देखावा साकरण्यात आला आहे. हेकोपरगावकरांसाठी मोठे आकर्षण ठरत आहे. – राजेंद्र देशमुख अध्यक्ष, उत्सव समिती