अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा.. शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे
कोपरगाव (वार्ताहर) गेल्या दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. कोपरगाव तालुक्यातही काल झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केली आहे.

पोहेगाव चांदेकसारे परिसरात जवळपास 115 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 29 नाल्याला आलेल्या पुराने चांदेकसारे येथील आदिवासी कुटुंबांची लोकवस्ती पाण्यात गेली. अन्नधान्यापासून संसार उपयोगी साहित्यांचे त्यांचे प्रचंड नुकसान झाले. पुरात बाधित झालेल्या या कुटुंबाला आधार देण्यासाठी प्रशासनाने पुढे यावे संपूर्ण परिस्थितीचे पंचनामे करून त्यांना मोठी नुकसान भरपाई द्यावी. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठ्या कष्टाने पिके उभी केली होती. ऊस सोयाबीन मका कपाशी व भाजीपाला अदी पिके शेतकऱ्यांच्या शेतात जोमात उभी होती. एकरी हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पिके उभी केली होती. बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीन सोंगुन ठेवलेल्या होत्या काल झालेल्या अतिवृष्टीमळे संपूर्ण सोयाबीन पीक पाण्याखाली गेले. अजूनही दोन दिवस पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिल्याने आता शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही अशी भीती निर्माण झाली आहे.
त्यामुळे कृषी व महसूल विभागाने तातडीने कोपरगाव तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आधार द्यावा. त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केली आहे.